Wednesday, January 3, 2007

माझी स्वेच्छानिवृत्ती

स्वेच्छानिवृत्तीची कारणे-
प्रकाश घाटपांडे रेडिओ यांत्रिक पोलिस बिनतारी संदेश विभाग,म.रा.
१) व्हीआरएस ही पूर्वनियोजित होती म्हणून
२) रेडिओ यांत्रीकी वर्गीकरण १ च्या लेखी परिक्षेत निकालाबाबत यंदा काहीतरी गड्बड आहे याचा निषेध म्हणून
३) नोकरी पुरेशी झाली आणी नोकरी नकोशी झाली म्हणून
४) शासनावरील भार कमी करण्यासाठी
५) शासकिय चौकटीत व्यक्तीमत्वाची घुसमट होते म्हणून
६) रिक्त पद निर्माण करून इतरांना रोजगारची संधी निर्माण व्हावी म्हणून
७) व्यक्तिमत्वाची कात टाकण्यासाठी,व्यक्तिमत्व विकसित होण्यासाठी म्हणून
८) मी या पदासाठी लायक नाही असे मला वाटते म्हणून
९) कुठे थांबायच हे मला समजल आहे म्हणून
१०) बिनतारी विभागाच्या प्रकृतीशी माझे व्यक्तीमत्व सुसंगत नाही म्हणून
११) फ़लज्योतिष या आवडत्या विषयावर संशोधन करण्यासाठी म्हणून
१२) माझ्याकडे असलेल्या गुणांचा शासनाला( बिनतारी विभागाला) काही उपयोग करता येईल असे वाटत नाही म्हणून
१३) शहाण्याचा नोकर व्हावे पण मुर्खांचा मालक होवू नये, इथे तर आम्ही मुर्खांचेच गुलाम आहोत अशी भावना आहे म्हणून
१४) आपण या यंत्रणेत दीर्घ काळ टिकणार नाही हे स्वतःला माहीत आहे म्हणून
१५) शासकिय यंत्रणा हा आजारी उद्योग आहे असे मानले जाते,अशा ठिकाणी काम करून आपले व्यक्तिमत्व आजारी पडेल अशी भीती वाटते म्हणून
१६) पुन्हा विद्यार्थी बनायचं आहे म्हणून
१७) स्वच्छंदी जगण्यासाठी म्हणून
१८) भावनिक दृष्ट्या असलेला राजीनामा व्यावहारिक दृष्ट्या व्यक्त करता यावा म्हणून
१९) बंडखोरी म्हणून
२०) पुण्याच्या बाहेर बदली होण्याची दाट शक्यता होती व त्यामुळे कौटुंबिक अडचणीत भर पडणार होती म्हणून
२१) मी हृदयविकारातुन वाचलो होतो. आता परत प्रकृतीवर ताण येवू नये म्हणून
२२) बिनतारी वर्तुळ आणि 'तारी' वर्तुळ यात दुभंगलेले व्यक्तिमत्व सावरण्यासाठी म्हणून
२३)ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याकडे शहाणपण नाही, ज्यांच्याकडे शहाणपण आहे त्यांच्याकडे सत्ता नाही आणि सत्तेपुढे शहाणपण चालत नाही हे मला माहीत आहे म्हणून

स्वेच्छानिवृत्तीकडे वाट्चाल

स्वेच्छानिवृत्तीची कारणे ही खरीच कारणे आहेत की प्रश्नचिन्ह आहेत? ही खरी तर मनाची स्पन्दन आहेत.कधी दबलेली तर कधी दाबलेली.वेगवेगळ्या मनाच्या अवस्थांची! काही स्पंदन ही तुमच्या आमच्या सर्वांच्या मनात आलेली असणार.भले ती व्यक्त न होवो. माझ्या बायकोन मंजिरीनं सांगितल घेउन टाक स्वेच्छानिवृत्ती.मी आहे सांभाळायला.ही ताकद प्रत्येकाच्या वाट्याला येईलच असे नाही.
लोक म्हणाले,''तुझं ठीक आहे रे, आमचं काय?" माझ्याकडं उत्तर नाही.रिटायर का होताय? असं लोक विचारतात तेव्हाच रिटायर होण्यात मजा आहे.
मग करायचं काय VRS नंतर?आयुष्याचा दुसरा टप्पा.भरपूर पुस्तक वाचावीत,पेपर वाचावेत,चांगली नाटक सिनेमे बघावे,गाणी ऎकावीत,गाणी म्हणावीत,कवीता कराव्यात,कवीता ऐकवाव्यात,स्वतःही ऐकाव्यात,भरपूर हसावं,भरपूर रडावं,चांगली चांगली व्याखानं ऎकावीत,परिसंवादांना जावं,अभ्यासगटांमध्ये जावं,वादसंवाद करावेत,भूभूंशी खेळाव,भूभार्ड्या दिवसात रमावं,भरपूर लॆखन कराव,चिंतन करावं,आत्मपरिक्षण करावं,फ़लज्योतिषाचे मूलभूत संशोधन प्रकल्प हाती घ्यावेत, फ़लज्योतिषावर व्याखानं द्यावीत,ऐकावीत,समुपदेशन करावं,ग्रंथालय पालथी घालावीत,फ़ूटपाथवरची पुस्तक चाळावीत,मानसशास्त्राचा अभ्यास करावा,संगणकाचा अभ्यास करावा,संगणकाचा धूर्त व चाणाक्षपणे वापर करावा, नेटकरांच्या तंतरलेल्या मैत्रबनात फिराव,विद्वत्जनांचा स्नेह संपादित करावा,स्वतः प्रोत्साहित व्हाव,इतरांना प्रोत्साहित कराव, समाजकारण, अर्थकारण,धर्मकारण यात फ़िरुन यावं,निसर्गरम्य ठिकाणे पहावीत,पर्यटन कराव,रात्रीच्या आकाशात तारांगण पहाव,इतरांना दाखवाव,कधी बुद्धीबळ खेळावं,कधी मनसोक्त पाण्यात डुंबावं,आरोग्य सांभाळावं,आयुष्यावर बोलावं,इतरांनाही बोलतं करावं,स्वतःला माफ़ करावं,इतरांनाही करावं,प्रेमही करावं,द्वेषही करावा,पुण्यही करावं,पापही करावं,स्वार्थही करावा,परमार्थही करावा,भूतकाळात रमाव,भविष्यकाळातल्या स्वप्नातही रमावं,वर्तमान जगावा,कधी काळाच्या पुढंही जाव तर कधी मागही रहाव, आणि एकदा काळाबरोबर अनंतात विलिन व्हावं.