प्रकाश गो. घाटपांडे
डी २०२ कपिल अभिजात डहाणुकर कॊलनी
कोथरुड पुणे ४११०२९
दि. २६ जून २००७
मा. पोलिस आयुक्त,
पुणे शहर
विषय :- सेवानिवृत्ती प्रकरणासंबंधी कार्यालयीन कर्मचा-यांची अनास्था/बेजबाबदार वृत्ती
बाबत......
संदर्भ:- १)वित्त विभाग शासन परिपत्रक सेनिवि १००६/८१/सेवा४ दि.२० नोव्हेंबर २००६
२) यापुर्वी दि. १९ जून २००७ चा माझा अर्ज
३) दै.सकाळ वृत्त दि.७/६/२००६
अर्जदार:- प्र.गो.घाटपांडे (निवृत्त रेडिओ यांत्रिक बिनतारी विभाग पुणे शहर)
मा.महोदय
मी आपल्या आस्थापनेवरुन बिनतारी विभागाच्या रेडिओ यांत्रिक पदावरुन(सहा.पो.उपनिरिक्षक बि.सं विभाग,अभियांत्रिकी) दि.३१ मार्च २००७ रोजी स्वेच्छानिवृत्त झालो. निवृत्तीवेतन व तदानुषंगिक लाभ मिळणेबाबतच्या प्रक्रियेचा पाठपुरावा म्हणून मी पोलिस आयुक्त कार्यालयात दि.२२ जून २००७ रोजी आलो असता माझे सेवापुस्तक हे वेतन पडताळणी पथकाकडून परत आल्याचे समजले. या संबंधी चौकशी संबंधित कारकून श्रीमती नाईक यांचे कडे केली असता वेतन पडताळणी पथकाकडून हरकत आल्याचे सांगितले. सदर हरकती मध्ये पदाची वेतननिश्चिती करुन त्या अनुषंगाने अतिप्रदान वेतन वसुली व नोंदीसह फेर सादर करावे असा उल्लेख होता. आता या पुढिल प्रक्रिया काय? सदर बाबींच्या पुर्ततेबाबतची जबाबदारी कुणाची? अशी माहिती विचारली असता श्रीमती नाईक यांनी 'आपंण संबंधीत पथकाकडून भेटून करुन घ्या' असे सांगितले.तसेच 'माझी बदली झाली आहे, मला या वेतननिश्चिती बाबत माहित नाही, मी ते काम करणार नाही, आपले सेवापुस्तक तसेच पडून राहू देत, नंतर येणारा कारकून बघेल, आपण विनाकारण माझा वेळ घेउ नका' अशा प्रकारची वक्तव्ये केली.
पोलिस आयुक्त कार्यालयातील प्रत्येक कर्मचारी हा पोलिस आयुक्तांसाठी. पोलिस आयुक्तांच्या वतीने काम करित असतो. तो पोलिस आयुक्तांचा प्रतिनिधी असतो. त्यामुळे त्याने जबाबदारीने वागले पाहिजे. व पोलिस आयुक्तांची प्रतिमा खालावणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. पुणे शहर पोलिस आयुक्त या नात्याने पोलिस व जनता यात सुसंवाद राखण्यासाठी आपण दि. १४ मे २००७ रोजी टिळक स्मारक मंदिरातील वसंत व्याखानमाला या वैभवशाली परंपरा असलेल्या व्याख्यानमालेचे पुष्प गुंफताना, नागरिक या नात्याने मी लेखी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण अत्यंत अभ्यासपूर्ण,व्यासंगी, वास्तववादी व समाधानकारक दिली होती. हे प्रश्न कार्यालयातील उपलब्ध व उपयुक्त मनुष्यबळाच्या कार्यक्षमतेसंबंधी असल्याने त्याच पार्श्वभूमीवर हा अनुभव मला नोंद घेण्यासारखा वाटला.माझ्यासारख्या सेवानिवृत्त कर्मचा-याला जर आपल्याच कार्यालयाचा हा (सौजन्यपूर्ण?)अनुभव येत असेल तर सामान्य नागरिकांशी हे लोक कसे वागत असतील? मला हा अनुभव ही अपवादात्मक बाब नसून सरकारी कार्यालयातील प्रातिनिधिक व प्रतिकात्मक स्वरुपाची बाब वाटते.
दै.सकाळ दि.७ जून २००७ मधील 'निवृत्तीवेतन मंजूरीसाठी लाच घेणा-याला अटक' अशा मथळ्याच्या बातम्या चिंताजनक वाटतात.(संदर्भ क्र.३) तरीदेखील यासदृश अनुभव येत असतील व संबंधीत कर्मचा-यांना कारवाईची कुठलीही भीती वाटत नसेल तर ती बाब मला अधिकच चिंताजनक वाटते.निवृत्तिवेतन व अनुषंगिक लाभ हे वेळेवर प्रदान न होणेबाबत महालेखाकार कार्यालयाने विशेष दखल घेतली असून ते वेळेवर प्रदान व्हावेत यासाठी वेळोवेळी शासन निर्णय,परिपत्रक काढली आहेत.त्यात कार्यालयाच्या जबाबदारीचे स्पष्टपणे निर्देश आहेत.(संदर्भ क्र.१ व त्या अंतर्गत). आतातर समन्वय व सहकार्यासाठी वित्त विभागाचे लेखाअधिकारी प्रतिनियुक्तिवर देखिल आहेत.
प्रबळ इच्छाशक्ति, अधिकार, नियोजन, पारदर्शकता, कार्यक्षमता, कार्यालयांतर्गत सुसंवाद, समन्वय या आधारे निवृत्तीवेतन प्रकरणच काय पण कुठ्ल्याही अडचणींचे निराकरण करता येते अशी माझे मत आहे.
माझ्या निवृत्तीवेतन प्रकरणाची कार्यालयीन स्थिती व गतिशीलता बघता मला निवृत्तीवेतन वेळेवर मिळेल असे वाटत नाही, तरी देखिल सदर प्रकरण हे माझे एकट्याचे निवृत्ति प्रकरण आहे असे न मानता अनुषंगिक पार्श्वभूमिचेही अवलोकन करावे अशी नम्र विनंती आहे. उचित कार्यवाही आपण करालच अशी खात्री मी बाळगतो.
आपला विश्वासू
(प्रकाश गो. घाटपांडे)
स्वेच्छानिवृत्त रेडिओ यांत्रिक बिनतारी विभाग पुणे शहर
प्रत - महालेखाकार (ले व ह) महाराष्ट्र मुंबई
No comments:
Post a Comment