Thursday, March 29, 2007

संचालकांना पत्र

प्रकाश घाटपांडे
फलज्योतिष चिकित्सा मंडळ
द्वारा डी २०२ कपिल अभिजात, डहाणूकर कॉलनी,
कोथरुड पुणे ४११०२९
http://www.faljyotishachikitsa.blogspot.com मोबाईल नं ९९२३१७०६२५
दि. २९.३.२००७

प्रति,
मा. श्री. पी.टी. लोहार
संचालक पोलीस बिनतारी संदेश विभाग म.रा.

सप्रेम नमस्कार,
आपला माझा परिचय नाही. आपण पोलीस खात्यातील बिनतारी विभाग हे एक कुटुंब मानले तर त्या कुटुंबाचे प्रमुख आहात त्या कुटुंबाचा घटक या नात्याने लिहित आहे. कुटुंब प्रमुखाला आपल्या विशाल कुटुंबातील सर्वच व्यक्तींचा परिचय असतोच असे नाही. मी दि. ३१ मार्च २००७ रोजी रेडिओ यांत्रिक या पदारुन पुणे शहर येथून स्वेच्छानिवृत्त होत आहे. आपणही लवकरच निवृत्त होणार आहात. जाताजाता कुटुंबातील या घटकाचा आपणास परिचय व्हावा एवढयाच आणि केवळ एवढयाच हेतूने हे पत्र लिहित आहे. एखाद्या व्यक्तीचा परिचय हा त्याच्या आचार-विचारातून व्यक्त होत असतो. आपण संवेदनाशील कवी आहात. साहित्या विषयी आपणास प्रेम आहे. म्हणूनच माझे काही साहित्य सोबत पाठवित आहे. रुढार्थाने मी नास्तिक व विवेकवादी विचारांचा तसेच अभिव्यक्ती स्वातंत्रयाचा पुरस्कर्ता आहे. माझे विचार आपणास पटतीलच असे नाही. तरी पण विचार करावयास नक्कीच लावतील असा विश्वास वाटतो. बिनतारी विभागातून स्वेच्छानिवृत्ती घेताना एका गोष्टीचे नक्कीच वाईट वाटते ते म्हणजे या वर्षी रेडिओ यांत्रिक वर्ग १ लेखी परिक्षेसाठी झालेल्या 'निकालनिश्चिती प्रकरणा`चा मी बळी ठरलो. माहिती अधिकाराचा वापर करुन मिळालेल्या माहितीतून ही बाब आता सूर्य प्रकाशा इतकी स्वच्छ समजली आहे. आपण या बाबतीत किती संवेदनाशील आहात हे मला माहित नाही. तरी पण स्वत:चे सद्सद्विवेकबुद्वीचे न्यायालय हे सगळयात मोठे न्यायालय आहे, ज्यात ऐहिक जगातील न्यायालयात दोषी असणारी व्यक्ती निर्दोष असू शकते अथवा निर्दोष असणारी व्यक्ती दोषी असू शकते असे मी मानतो. आपणास उचित वाटल्यास या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालावे अशी विनंती मी आपणास करतो.सोबत माझे काही साहित्य सप्रेम भेट म्हणून पाठवित आहे. वाचक या नात्याने प्रतिक्रिया पाठविल्यास स्वागतार्हच आहे.
आपला विश्वासू

प्रकाश घाटपांडे

1 comment:

Anonymous said...

I agrree with you